रायगड लोकधारा वृत्तसेवा :
पत्रकार पुजा चव्हाण उरण : उरण रेल्वे स्टेशन समोरील मोकळ्या मैदानात गांजा ओढताना जतीन महेश म्हात्रे, वय 29, रा. मुळेखंड तेलीपाडा याला उरण पोलिसांनी 30 मे रोजी रात्री 9:15 वाजता रंगेहाथ पकडले. पोलिसांना याची माहिती मिळताच गुंगीकारक औषधीद्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8(क), 27 अन्वये गु.र.नं. 164/2026 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोउनि संजय राठोड करत आहेत.
सपोनि संजय राठोड यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने रात्रीच्या गस्तीदरम्यान ही कारवाई केली. मात्र, या कारवाईनंतर नागरिकांमधून एकच सवाल उपस्थित होत आहे की, गांजा ओढणाऱ्या तरुणाला पकडले, पण हा गांजा उरणात आणतो कोण आणि विकतो कोण? केवळ सेवन करणाऱ्यांवर कारवाई करून हा प्रश्न सुटणार नाही. जोपर्यंत या अंमली पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या मुख्य सूत्रधारांच्या मुसक्या आवळल्या जात नाहीत, तोपर्यंत तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकतच राहणार आहे.
उरण शहरात व ग्रामीण भागात गांजा सहज उपलब्ध होत असल्याची चर्चा आहे. स्टेशन परिसर, मोकळी मैदाने ही व्यसनी तरुणांची अड्डे बनली आहेत. पोलिसांनी सेवन करणाऱ्यांसोबतच हा माल पुरवणाऱ्या मोठ्या मास्यांनाही जाळ्यात ओढावे, अशी जोरदार मागणी आता नागरिक व पालकवर्गातून होत आहे. केवळ पिणाऱ्याला पकडून आकडेवारी वाढवण्यापेक्षा मुळापासून हा रोग उपटून काढण्यासाठी पोलिसांनी गांजा विक्रेत्यांची साखळी उद्ध्वस्त करावी, अशी अपेक्षा जनतेकडून करण्यात येत आहे.
