रायगड लोकधारा वृत्तसेवा :
पनवेल | प्रतिनिधी : पनवेल शहरात वाहतूक नियमांची अंमलबजावणी करत असताना पनवेल वाहतूक शाखेने अमलीपदार्थांविरोधात महत्त्वाची कारवाई केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे विना हेल्मेट वाहन तपासणी करत असताना पोलिसांनी संशयित स्कुटर थांबवून तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आला.
पोलीस नाईक राकेश राजपूत यांनी व्हिस्पा कंपनीची MH 05 EB 6183 क्रमांकाची स्कुटर तपासली असता डिक्कीतून सुमारे २५ हजार रुपये किंमतीचा २९ ग्रॅम वजनाचा उग्र वास असलेला हायड्रो गांजा आढळून आला. कारवाईदरम्यान एकूण सुमारे १ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जप्त मुद्देमालात २९ ग्रॅम गांजा (२५,००० रुपये), व्हिस्पा स्कुटर (७५,००० रुपये) आणि आयफोन १४ प्रो (५०,००० रुपये) यांचा समावेश आहे. या प्रकरणी केतन गिरीश मालू (वय २२, रा. खांदा कॉलनी, पनवेल) यास अटक करण्यात आली असून त्यास न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या बाबतचा गुन्हा पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून अधिक तपास पनवेल शहर पोलीस करत आहेत.
