रायगड लोकधारा वृत्तसेवा :
मुंबई प्रतिनिधी : सतिश पाटील / महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र अर्थात इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल उद्या, शुक्रवार दि. 8 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. निकाल जाहीर करण्यापूर्वी उद्या सकाळी 11 वाजता राज्य मंडळ कार्यालयात अधिकृत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत निकालाची टक्केवारी, विभागनिहाय निकाल, उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या तसेच इतर महत्त्वाची माहिती जाहीर केली जाणार आहे.
विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार असून, त्यासाठी अधिकृत संकेतस्थळांवर जाऊन आसन क्रमांक आणि आईचे नाव टाकून निकाल तपासता येईल. निकाल जाहीर होताच संकेतस्थळांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांनी संयम राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र बोर्डाकडून दहावी आणि बारावीचे निकाल विक्रमी वेळेत जाहीर करण्याची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. यंदाही बारावीचा निकाल 2 मे रोजी जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत दहावीचा निकाल जाहीर होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला गती मिळणार असून, अकरावी प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, निकालाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले असून, अनेकांचे लक्ष आता उद्याच्या दुपारी 1 वाजता लागले आहे.
