रायगड लोकधारा वृत्तसेवा :
सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
मुंबई प्रतिनिधी : सतिश पाटील / वाकोला येथील मासळी बाजारात मासे कापण्यावर महानगरपालिकेने निर्बंध लादल्याचे वृत्त समाजमाध्यमांवर प्रसारित झाले आणि मासळी विक्रेत्या महिला, कोळी बांधव आक्रमक झाले. विरोधी पक्षांनीही सत्ताधाऱ्यांवर शरसंधान करण्यास सुरुवात केली.
मुंबई : वाकोला येथील मासळी बाजारात मासे कापण्यावर महानगरपालिकेने निर्बंध लादल्याचे वृत्त समाजमाध्यमांवर प्रसारित झाले आणि मासळी विक्रेत्या महिला, कोळी बांधव आक्रमक झाले. विरोधी पक्षांनीही सत्ताधाऱ्यांवर शरसंधान करण्यास सुरुवात केली. सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोपांमुळे बाकोला मासळी बाजार आकाडा बनला. दरम्यान, मुंबईमधील कोणत्याही मासळी बाजारात मासळी कापण्यास निर्बंध घालण्यात आलेले नाहीत, असे महापौरांनी वाकोला मासळी बाजारात धाव घेऊन मासळी विक्रेत्या महिलांसोबत संवाद साधताना स्पष्ट केले.
वाकोला येथील मासळी बाजारात मासे कापण्यास महानगरपालिकेच्या स्थानिक प्रशासनाकडून मनाई केल्याचा आरोप समाजमध्यामांवरून होत आहे. त्यावरून विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांवर कडवी टीका केली. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी गुरुवारी सकाळी वाकोला मासळी बाजाराला भेट देऊन कोळी भगिनींबरोबर संवाद साधला. मासे कापण्यावर महानगरपालिकेने कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. कोळी भगिनी आणि बांधवांनी निर्धास्तपणे आपला व्यवसाय करावा. मुंबईचे मूळ नागरिक म्हणून कोळी समाजाची ओळख आहे. मुंबईची महापौर म्हणून मी आणि महानगरपालिका प्रशासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. त्यामुळे त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. मासे कापण्याच्या अनुषंगाने ज्या काही अफवा पसरवल्या गेल्या, तो अपप्रचाराचा भाग आहे. त्याला कोणीही बळी पडू नये, असे आवाहन रितू तावडे यांनी केले.
त्यावेळी महापौरांनी स्थानिक मासळी व्यावसायिकांशी देखील संवाद साधला. आपल्याला कोणीही रोखले नसल्याचे आणि कुणीही त्रास देत नसल्याचे या कोळी भगिनींनी स्पष्ट केले. जर कोणी रोखण्याचा प्रयत्न केला तर थेट माझ्याशी संपर्क साधावा, सर्व अडचणींचे निराकरण मी करीन, असे आश्वासन महापौरांनी कोळी भगिनींना दिले.
मुंबईतील वाकोला येथील मासळी बाजारात मासे कापण्यावर आणि मासे स्वच्छ करण्यावर मुंबई महानगरपालिकेने बंदी घातल्याचे वृत्त समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाले. मासे कापल्यामुळे परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याच्या कथित वृत्तामुळे मासळी व्यावसायिकांमध्ये चिंता वाढली होती. त्यांनतर विरोधकांनी देखील आक्रमक भूमिका घेत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
कोळी बांधव मुंबईतील मूळ रहिवासी असून बाहेरून येणारे व्यावसायिक कोळी बांधवांचा व्यवसाय बंद करू शकत नाहीत. परप्रांतातून आलेल्यांना त्रास होत असेल, तर त्यांनी मुंबई सोडावी. गेली अनेक वर्षे कोळी बांधव मुंबईत मासे विकत आहेत. भविष्यातही ते त्याच पद्धतीने मासे विकणार. मुंबई महापालिकेने कोळी बांधवांवर कारवाई करून दाखवावीच. मुंबईच्या खऱ्या मानकऱ्यांना कोण डिवचतं ते आम्ही पाहू, असा इशारा असे विरोधी पक्षनेत्या, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनीही आक्षेप नोंदवत मुंबईतील मच्छीमार आत्ता जिलबी आणि फाफडा विकणार का? असा संतप्त सवाल केला.
