रायगड लोकधारा वृत्तसेवा :
रायगड लोकधारा प्रतिनिधी / पुणे : दिराची कारागृहातून सुटका करून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिलेने नकार दिल्यानंतर तिला धमकावून शिवीगाळ केल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून कैलास दौलत सावंत (रा. चव्हाण वस्ती, थेऊर, ता. हवेली) याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 मे रोजी रात्री महिला घरामागील परिसरात गेली असता आरोपी तिच्या समोर आला. त्यावेळी “तुझ्या दिराची सुटका करायची असेल तर माझ्यासोबत झोप,” अशी मागणी त्याने केल्याचा आरोप आहे. घाबरलेल्या महिलेने सुरुवातीला ही बाब कोणालाही सांगितली नव्हती.
त्यानंतर 20 मे रोजी पुन्हा आरोपीने तिचा पाठलाग केल्याचे सांगण्यात आले. तसेच 22 मे रोजी रात्री आरोपीने महिलेला माळरानात गाठून तिचा हात पकडत पुन्हा शरीरसुखाची मागणी केली. महिला विरोध करताच आरोपीने “माझी मागणी मान्य केली नाही तर तुझ्या दिराला जेलमध्येच सडवेन,” अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
घटनेनंतर महिलेने आपल्या कुटुंबीयांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर धीर करून तिने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी संबंधित आरोपीविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
