
चिरनेरच्या पूरग्रस्तांच्या मदतीला शिवसेना धावली! विनोद साबळेंची घरोघरी पाहणी, तातडीची मदत आणि नुकसान भरपाईची मागणी…
चिरनेर, उरण प्रतिनिधी l पूजा चव्हाण : दोन दिवसांपूर्वी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे उरण तालुक्यातील चिरनेर गावाला मोठा फटका बसला. गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने संसार उघड्यावर पडला. नागरिकांचे लाखोंचे नुकसान झाले. या संकटाच्या वेळी शिवसेना पक्षाने तातडीने पूरग्रस्तांच्या मदतीला धाव घेतली.
शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब तसेच रायगडचे खासदार मा. श्रीरंग आप्पा बारणे यांच्या आदेशानुसार शिवसेना उरण तालुक्याच्या वतीने आज चिरनेर गावात पाहणी आणि मदत दौरा काढण्यात आला.
या दौऱ्यात शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख मा. विनोद साबळे यांनी पूरग्रस्त भागात जाऊन प्रत्येक घराची प्रत्यक्ष पाहणी केली. पाण्यामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेत त्यांनी प्रशासनाला तातडीचे आदेश दिले. तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधून त्यांनी गावातील प्रत्येक नुकसानग्रस्ताचे पंचनामे तात्काळ करून शासनाकडून योग्य नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी ठाम मागणी केली.
“नागरिक संकटात असताना फक्त फोटो काढून चालणार नाही. त्यांना तातडीची मदत आणि भरपाई मिळाली पाहिजे” असे यावेळी साबळे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
फक्त पाहणीच नाही तर शिवसेना उरण तालुक्याच्या वतीने पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटपही करण्यात आले. किराणा, कपडे, स्वच्छतेचे साहित्य आणि इतर घरगुती गोष्टींचे वाटप करून संकटात सापडलेल्या कुटुंबांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी शिवसेना उरण तालुकाप्रमुख दिपक ठाकूर यांनी पूरग्रस्तांच्या हातात घरगुती साहित्याचे किट सुपूर्द केले. “पक्ष शेवटच्या माणसापर्यंत मदत पोहोचवेल. आम्ही तुमच्यासोबत आहोत” असा विश्वास त्यांनी नागरिकांना दिला.
या उपक्रमाला जिल्हा संघटक महेंद्र पाटील, विधानसभा संपर्क प्रमुख रमेश म्हात्रे, विधानसभा संघटक निखिल पाटील, तालुका संघटक चंद्रकांत पाटील, उरण शहरप्रमुख सुलेमान शेख, विभाग प्रमुख अक्षय म्हात्रे यांच्यासह चिरनेरचे तालुका समन्वयक सचिन पाटील, शाखाप्रमुख हिम्मत केणी आणि मोठ्या संख्येने महिला-पुरुष ग्रामस्थ उपस्थित होते.
दोन दिवसांपासून पावसामुळे हवालदिल झालेल्या चिरनेरकरांना शिवसेनेच्या या मदतीमुळे मोठा आधार मिळाला आहे. प्रशासनाने आता पंचनामे लवकर करून भरपाई द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
