रायगड लोकधारा वृत्तसेवा :
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माजी नगरसेविका व खारघर फोरमच्या अध्यक्षा लीना गरड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट घेतली. यानंतर राजकीय वर्तुळात त्यांचं शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश होणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.
लीना गरड यांनी विधानसभेच्या निवडणुकीत ४०,००० हून अधिक मते मिळवून आपली राजकीय ताकद सिद्ध केली आहे. सध्या ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे गट वा भाजपमध्ये प्रवेश करत असताना गरड यांच्या या भेटीमुळे चर्चांना आणखी उधाण आले आहे.
या चर्चांवर स्पष्टीकरण देताना लीना गरड म्हणाल्या, “पनवेल महापालिका क्षेत्रातील सुमारे अडीच लाख मालमत्ताधारकांच्या मालमत्ता करासंबंधीच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठीच मी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली..” गरड यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ नगरविकास विभागाचे प्रधान सचिव के. गोविंदराज यांना सुचना दिल्या. त्यानंतर गोविंदराज यांच्या अध्यक्षतेखाली सिडको वसाहतींवरील दुहेरी कर, सवलतीतील भेदभाव, कायद्यातील त्रुटी व मागील पाच वर्षांचा अन्यायकारक कर यावर सविस्तर चर्चा झाली. या अनुषंगाने २८ मे रोजी मंत्रालयात पनवेल आयुक्त मंगेश चितळे यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री हे नगरविकास खात्याचे मंत्री असल्याने नागरिकांच्या न्यायासाठी त्यांचा हस्तक्षेप आवश्यक आहे, असेही गरड यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून ‘एकला चलो रे’ची भूमिका घेणार असल्याच्या चर्चांवर विचारले असता लीना गरड यांनी, “यासंबंधी मला काही माहिती नाही,” असे सांगितले.

