रायगड लोकधारा वृत्तसेवा :
अलिबाग सचिन पाटील : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वावर तसेच अलिबाग-मुरुड-रोहा विधानसभा अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे प्रतोद अमित नाईक यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत सारळ ग्रामपंचायत परिसरातील शेतकरी कामगार पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार असलेले सुशील पाटील यांच्यासह महेंद्र थळे, पार्थ पाटील, चेतन पाटील (नवखार), साई भगत, सनी पाटील, विश्वास पाटील (मिळकतखार), जगदीश म्हात्रे, गणेश ठोंबरे आणि वसंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे, शेकापचे ज्येष्ठ नेते सुशील पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “गेली ३८ वर्षे शेतकरी कामगार पक्षात प्रामाणिकपणे काम केले. पक्ष वाढीसाठी सातत्याने योगदान दिले. मात्र पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारी प्रक्रियेदरम्यान पक्षाकडून वारंवार नाराजी आणि अडचणींचा सामना करावा लागला.” ते पुढे म्हणाले की, “आज राष्ट्रीय पक्षात प्रवेश करताना आम्ही नवीन जबाबदारी स्वीकारत आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या विचारांना खारेपाटाच्या भूमीत बळ देण्याचा संकल्प केला असून त्या विचारांचा विस्तार केल्याशिवाय शांत बसणार नाही.”
या प्रवेशामुळे सारळ आणि परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त होत असून शेतकरी कामगार पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे. स्थानिक स्तरावर या प्रवेशाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲड. प्रवीण ठाकूर, जिल्हा परिषदेचे गट नेते अमित नाईक, जिल्हा सर चिटणीस चारुहास मगर, चिटणीस आशिष भट, आदी सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
