रायगड लोकधारा वृत्तसेवा :
मुंबई प्रतिनिधी : सतिश पाटील / पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे 4 वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर राज्यभर संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेत सरकारकडे महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.
या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 7 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र, या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी नवले पुलावर आंदोलन करत न्यायाची मागणी केली होती, ज्यामुळे पुणे-बेंगळुरू महामार्ग काही तास ठप्प झाला होता.
माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी 14 दिवसांत न्याय देण्याचं आश्वासन दिलं आहे. मात्र केवळ आश्वासन न राहता तातडीने कारवाई व्हावी, ही अपेक्षा आहे.” त्यांनी या प्रकरणात जलदगतीने चार्जशीट दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
याचवेळी त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाबाबत मोठं विधान केलं. “सध्या महिला आयोगाचं अध्यक्षपद रिक्त आहे. त्या ठिकाणी मीरा बोरवणकर यांची नियुक्ती करावी. पर्याय म्हणून मेधा गाडगीळ, वर्षा देशपांडे किंवा मनीषा गुप्ते यांसारख्या अनुभवी व्यक्तींना संधी द्यावी,” अशी मागणी त्यांनी केली.
तसेच, “महिला आयोगावर राजकीय व्यक्ती नेमू नयेत, तर तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तींनाच संधी द्यावी,” असा आग्रहही त्यांनी धरला. याशिवाय, महिलांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा मानला जाणारा ‘शक्ती कायदा’ तातडीने लागू करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
या घटनेनंतर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सरकार कोणती ठोस पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर या 1981 मध्ये महाराष्ट्र केडरमधील पहिल्या महिला IPS ठरल्या. त्यांनी राज्यातील अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करताना ठसा उमटवला. 1994 मध्ये जळगाव सेक्स स्कँडल उघडकीस आणून त्या चर्चेत आल्या. मुंबई गुन्हे शाखेच्या प्रमुखपदावर असताना त्यांनी अंडरवर्ल्डविरोधात कडक कारवाई केली. दाऊद इब्राहीम आणि छोटा राजन यांच्या टोळ्यांवर कारवाई करून त्यांनी गुंडाराजाला आळा घातला.
