Oplus_131072
रायगड लोकधारा वृत्तसेवा :
रायगड लोकधारा प्रतिनिधी / खारघर : पनवेल महानगरपालिकेतील खारघर प्रभागाशी संबंधित वादग्रस्त अधिकारी जितेंद्र गंगाराम मढवी यांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, त्यांच्या कामकाजाची सखोल चौकशी करण्याचे आदेश पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे पालिका वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
जितेंद्र मढवी हे मूळतः स्वच्छता निरीक्षक पदावर कार्यरत असताना त्यांना नियमबाह्य पद्धतीने प्रभाग अधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाच्या शिष्टमंडळाने आक्षेप घेत त्यांच्या निलंबनासह चौकशीची मागणी केली होती.
मढवी यांच्यावर यापूर्वीही अतिक्रमण कारवाईदरम्यान फेरीवाल्यांकडून दंडाच्या नावाखाली रक्कम वसूल करताना पावती पुस्तकात फेरफार करून अनियमितता व भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणी त्यांची एक वेतनवाढ रोखण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे, गेली नऊ वर्षे ते एकाच प्रभागात कार्यरत असूनही त्यांची बदली करण्यात आलेली नाही. तसेच नागरिकांशी उर्मट वर्तन, लोकप्रतिनिधींचे फोन न घेणे आणि सर्वसामान्यांशी गैरवर्तन केल्याच्या अनेक तक्रारी पालिकेकडे प्राप्त झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर प्रहारच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांची भेट घेऊन मढवी यांच्या निलंबनाची मागणी केली होती. त्यानंतर आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत खारघर प्रभाग अधिकारी सुबोध ठाणेकर यांना सखोल चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचे प्रहारचे डॉ. सुनील शिरीषकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.
दरम्यान, मढवी यांच्याविरोधात पालिका वर्तुळात विविध चर्चा सुरू असून, गरीब फेरीवाले व दिव्यांग नागरिकांना त्रास दिला जात असल्याचे आरोपही करण्यात येत आहेत. तसेच कथित हप्तावसुलीमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संरक्षण मिळत असल्याचीही चर्चा रंगली आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करून त्यांची तत्काळ हकालपट्टी व निलंबन करण्यात यावे, अशी मागणी प्रहारकडून करण्यात आली आहे.
