🔴 रायगड लोकधारा वृत्त :
पनवेल प्रतिनिधी : भारत देशाच्या स्वतंत्र्यता चळवळीत महत्वपूर्ण योगदान देणारे तथा प्रत्येक भारतीय नागरिकामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणारे वंदे मातरम् हे गीत बंकिमचंद्र चटोपाध्याय द्वारा ०७ नोव्हेंबर १८७५ रोजी रचले गेले, सदर गीतास १९५० रोजी राष्ट्रीय गीत म्हणून मान्यताप्राप्त झाली. या गीताच्या रचनेस ०७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण होत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून व भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या पुढाकाराने देशभरात वंदे मातरम् गीताचे सामुहिक गायन करण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या. याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, न्यू पनवेल (अधिकारप्रदत्त स्वायत्त) च्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि महाराष्ट्रभूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने सीकेटी महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात शुक्रवार, दि. ०७ नोव्हेंबर रोजी वंदे मातरम् गीताचे सामुहिक गायन तथा सार्ध शताब्दी समारोहाचे दिमाखदार आयोजन करण्यात आले.
या समारोहाच्या अध्यक्षस्थानी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर तर मुख्य अतिथी म्हणून पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, पनवेलचे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पवन चांडक यांची प्रमुख उपस्थिती राहिली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल तहसीलदार मीनल भोसले, पनवेल महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्ये, उपायुक्त तथा परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, उपायुक्त प्रसेनजीत कार्लेकर, उपायुक्त रविकिरण घोडके, उपायुक्त सौरभ खर्गे, सहाय्यक आयुक्त रुपाली माने, शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजित अभंग, प्रवीण कदम, शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय कडू आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात भारतमातेच्या प्रतिमेने झाली, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री. मंगेश चितळे यांनी भारतमातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत त्यास अभिवादन केले, तद्नंतर सर्व मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. औपचारिक स्वागत समारोहामध्ये सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ. एस.के.पाटील आणि पनवेल आय.टी.आय. चे प्रभारी प्राचार्य विजय टीकोले यांच्याहस्ते व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत झाल्यानंतर पनवेल तालुक्याच्या तहसीलदार मा. मीनल भोसले यांनी प्रास्ताविक सादर करताना वंदे मातरम् गीताची पार्श्वभूमी स्पष्ट करत त्याचे महत्व विशद केले. सर्व उपस्थित विद्यार्थी समूहास संबोधित करताना त्यांनी राष्ट्रीय गीतामधील महत्वपूर्ण घटकांचे आणि संकल्पनांचे तार्कीकपणे विश्लेषण केले.
प्रास्ताविकाचे संबोधन झाल्यानंतर पनवेल आय.टी.आय. मधील विद्यार्थीनिंनी आपल्या सुमधुर वाणीतून भारताचे राष्ट्रीयगीत वंदे मातरम् गीताचे गायन केले. यासोबतच व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, व्यासपीठासमोरील विद्यार्थी जनसमुहाने एक ताल आणि सुरात वंदे मातरम् गीताचे सामुहिक गायन केले व संपूर्ण वातावरण राष्ट्रभक्तीच्या भावनेने अभिभूत झाले.
राष्ट्रीय गीताच्या सामुहिक गायनानंतर समारोहाचे मुख्य वक्ते विवेक विचारमंचाच्या कोंकण प्रांताचे संयोजक विजय वेदपाठक यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वंदे मातरम् गीताचा इतिहास सांगितला, यासोबत १८५७ चे पहिले स्वातंत्र्य समर, मातृशाक्तीचा जागर, राष्ट्रीय गीतच्या माध्यमातून भारतभूमीचे समर्पक पद्धतीने केलेले वर्णन आदींचा उल्लेख करत, कोणत्याही देशाच्या नागरिकाने त्याच्या देशाला मातेचा दर्जा देणारे एकमेव राष्ट्र म्हणजे भारत राष्ट्र असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी यांनी सर्व विद्यार्थ्यांशी हितगुज साधत वंदेमातरम् गीतामधील प्रत्येक नैतिक मूल्याचा आणि संकल्पनेचा अर्थ समजून एक जबाबदार नागरिकांप्रमाणे आपली सर्व कर्तव्ये यथायोग्य पद्धतीने पार पाडण्याबाबत भाष्य केले. सरतेशेवटी श्री. डी.डी. विसपुते महाविद्यालय, विचुंबे च्या चमूने पथनाट्याच्या माध्यमातून धर्म, जात, प्रांत, भाषा यांपासून वर येत आपण प्रथमतः भारतीय आहोत असा संदेश दिला. कार्यक्रमाची सांगता पनवेल आय.टी.आय. चे मा. दीपक बाग्ग्कर यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. तर सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. आकाश पाटील यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे अध्यक्ष डॉ. राजेश येवले, मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. आकाश पाटील, कार्यक्रम अधिकारी प्रा. आलोक भानुशाली, प्रा. सुशीलकुमार घाडगे, एन.एस. एस. विषय समन्वयक प्रा. रुपेश माने. यासोबतच पनवेल आय.टी. आय. चे प्रभारी प्राचार्य मा. श्री. विजय टीकोले नेतृत्वाखाली यांच्या समवेत त्यांच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग आणि स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
