रायगड लोकधारा वृत्तसेवा
गटविकास अधिकाऱ्याची विनंती सीईओंकडून मान्य…
पुरषोत्तम भोईर / पनवेल – विचुंबे : प्रचंड पाठपुराव्यामुळे विचुंबे ग्रामपंचायतीतील विकासकामांमध्ये झालेल्या अनियमिततेचा प्रकार उघड झाला. अनियमिततेला खतपाणी घालणाऱ्या पनवेल पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज असताना जिल्हा परिषदेच्या सीईओंकडून त्यांना माफी देण्यात येणार आहे. गटविकास अधिकारी समिर वठारकर यांनी सीईओंकडे अर्ज करून प्रशासकीय कामकाजात आर्थिक अनियमिततेची पूर्तता केली म्हणून माफ (क्षमापन) करण्याचे लेखी आर्जव केल्यानंतर सीईओ नेहा भोसले यांनी माफी देण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा 66 संहितेतील तरतुदीनुसार ग्रामपंचायतीत विकासकामे, साहित्य खरेदी करताना नियमांचे पालन करणे गरजेचे असते. विचुंबे ग्रामपंचायतीत सरपंच व ग्रामसेवक यांनी पालन न करता नियमबाह्य खर्च केल्याचे सिद्ध होऊनही कारवाई होत नाही. भाजपचे बडे नेते प्रशासनावर दबाव आणत असल्यामुळे सर्वसामान्यांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या प्रशासनाविरोधात मला कोकण आयुक्तांकडे तक्रार करावी लागली आहे. : – पुरुषोत्तम भोईर, तक्रारदार
पनवेल तालुक्यातील विचुंबे ग्रामपंचायतीत लाखो रुपयांची अनियमितता झाल्याचा प्रकार पुरूषोत्तम भोईर यांनी केलेल्या तक्रारीत समोर आला आहे. प्रशासनाकडून भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न सुरू असताना भोईर यांनी चिकाटीने पाठपुरावा सुरूच ठेवला. त्यामुळे विस्तार अधिकारी मिनल कनोजे यांनी केलेल्या चौकशीत मोठ्या प्रमाणात अनियमितता समोर आली. १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत तब्बल ५८ प्रकारच्या वेगवेगळ्या कामांमध्ये २२ लाख रुपये खर्च करण्यात आले. देवपूजेचे साहित्य खरेदी, मिठाई खरेदी, गटार दुरूस्ती, घंटागाडी दुरुस्ती, बॅनर छपाई, पेस्ट कंट्रोल आदी कामांचा समावेश होता. ६ महिने ते दीड वर्षांपूर्वी केलेल्या खर्चाची बिले नोव्हेंबर २०२५ मध्ये देखील जमा करण्यात आली.
विस्तार अधिकाऱ्यांनी चौकशी अहवालात उपस्थित केलेल्या त्रुटींची पूर्तता ग्रामपंचायतअधिकाऱ्यांकडून करण्यात आली. पैसे अदा केल्यानंतर दीड वर्षे जमा न केलेली बिले अवघ्या दोन दिवसांत जमा केली. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून गटविकास अधिकाऱ्यांना पूर्तता अहवालदेखील सादर करण्यात आला. तक्रार अर्जानंतर पाच महिन्यांनी चौकशी होणाऱ्या प्रकरणात शासनाने ग्रामपंचायतीचे सरपंच आणिग्रामपंचायत अधिकाऱ्यांना बिलांची पूर्तता करण्याची जाणीवपूर्वक संधी दिल्याचा आरोप पुरूषोत्तम भोईर यांनी केला होता. ‘अनियमिततेची पूर्तता करण्यात आली असून कुठेही आर्थिक अनियमितता झाली नाही. त्यामुळे क्षमापन करण्यात यावे’, अशी विनंती गटविकास अधिकारी समीर वठारकर यांनी केली होती. वठारकर यांच्या माफी अर्जाची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी त्यांना माफ करण्यात येत असल्याचे तक्रारदार भोईर यांना लेखी पत्राद्वारे कळविले आहे. सीईओंच्या भूमिकेमुळे भोईर यांनी थेट कोकण आयुक्तांकडे घडलेल्या प्रकाराची तक्रार केली आहे. ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराला जिल्हा प्रशासन खतपाणी घालत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे.
