रायगड लोकधारा वृत्तसेवा :
प्रतिनिधी पुजा चव्हाण / पनवेल : जनसेवेच्या महान यज्ञामध्ये उल्लेखनीय योगदान देत भावी पिढीला प्रेरणा देणारे माजी खासदार, दानशूर =पनवेल उरणचे भाग्यविधाते लोकनेते रामशेठ ठाकूर यांना पत्रकार उत्कर्ष समिती, महाराष्ट्र यांच्यातर्फे ‘जीवन गौरव’ सन्मान राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यावेळी जाहीर केला होता परंतु त्यांच्या कामकाजातील व्यस्ततेमुळे ते या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहू शकले नव्हते म्हणून आज त्यांना सन्मानाने गौरविण्यात आले. सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, राजकीय, सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रातील त्यांचे अनन्यसाधारण कार्य क्षितिजावर तळपणाऱ्या सूर्यासारखे तेजोमय आहे, अशा शब्दांत या तेजपुंजास गौरविताना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी पत्रकार उत्कर्ष समितीच्या वतीने प्रदेश अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे, खजिनदार शैलेश ठाकूर, रायगड उपाध्यक्ष, श्री. अशोक घरत, सदस्य श्री. सुनील भोईर, उरण तालुका अध्यक्ष पूजा चव्हाण आदी पदाधिकाऱ्यांनी रामशेठ ठाकूर यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेऊन शाल, पुष्पगुच्छ व मानपत्र देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला. “जनसेवेच्या महान यज्ञामध्ये आपले योगदान उल्लेखनीय असून भावी पिढीला प्रेरणादायी आहे. आपले कार्य क्षितिजावर तळपणाऱ्या सूर्यासारखे तेजोमय असून पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे या तेजपुंजास गौरविताना आम्हास आनंद होत आहे,” असा आशय असलेले मानपत्र यावेळी प्रदान करण्यात आले.
शून्यातून विश्व निर्माण करणारे रामशेठ ठाकूर हे आधुनिक काळातील ‘एकलव्य’ आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच त्यांच्या अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्यात गौरव केला होता. अवघ्या २०० रुपये पगारावर शिक्षक म्हणून कारकीर्द सुरू करणाऱ्या रामशेठ ठाकूर यांनी आपल्या आयुष्याची सर्व पुंजी समाजाला सुशिक्षित करण्यासाठी आणि उत्तम शैक्षणिक संस्था उभारण्यासाठी खर्च केली. ज्या रयत शिक्षण संस्थेने त्यांना घडवले, त्या संस्थेला त्यांनी आजवर १३५ कोटींहून अधिक रुपयांची गुरुदक्षिणा दिली आहे. घरचे दागिने गहाण ठेवून १० हजार रुपयांच्या पहिल्या कंत्राटातून व्यवसायाची सुरुवात करणाऱ्या ठाकूर यांनी भूमिपुत्रही मोठे कंत्राटदार होऊ शकतात हे जिद्दीने सिद्ध केले. १९९५ मध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि उड्डाणपुलांची अर्धवट सोडलेली कामे त्यांच्या धाडसी सहकार्यामुळेच पूर्ण झाली, अशी आठवण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही सांगितली होती.
जेएनपीटी व सिडकोच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी दिलेला लढा ऐतिहासिक आहे. दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली भूमिपुत्रांच्या हक्कासाठी ते नेहमीच अग्रभागी राहिले. राजकीय व आर्थिक शक्ती लोककल्याणासाठी सार्थकी लावणारा नेता म्हणून त्यांची ओळख अधोरेखित झाली आहे. जात, पात, धर्म, पक्ष असा भेदभाव न मानता जेवढी मदत करता येईल तेवढी करण्याची त्यांची वृत्ती आणि माणुसकी हाच त्यांचा धर्म राहिला आहे. वयाच्या ७५ व्या वर्षीही त्यांचे सामाजिक कार्य अखंडपणे सुरू असून सर्वसामान्यांचे ते आधारवड बनले आहेत.
‘रामपर्व’ या ग्रंथातून त्यांचा जीवनप्रवास उलगडला आहे. गाढवावरून माती वाहण्यापासून ते यशस्वी उद्योजक आणि राजकारणी होण्यापर्यंतचे खाचखळगे त्यांनी अनुभवले. सत्तेच्या राजकारणात असतानाही वयाच्या ५२ व्या वर्षी स्वेच्छेने निवडणूक राजकारणातून निवृत्ती घेण्याचा त्यांचा निर्णय राजकीय नि:स्पृहतेचे मोठे लक्षण मानले जाते. पुढील १० ते २० वर्षे जनतेची सेवा करण्यासाठी आपण सज्ज आहोत, अशी भावना त्यांनी अमृत महोत्सवी सोहळ्यात व्यक्त केली होती.
पत्रकार उत्कर्ष समितीने केलेल्या या सन्मानाबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कृतज्ञता व्यक्त केली. भूमिपुत्रांच्या हक्कासाठी व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या सत्कार सोहळ्याला समितीचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
