रायगड लोकधारा न्यूज :

यावल : यावल तालुक्यातील पिळोदा खुर्दे येथील कर्जबाजारी शेतकऱ्याला शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे बँकेचं कर्ज व हातउसनवारीचे पैसे कसे फेडायचे या विवंचनेतून त्याने विषारी द्रव्य प्राशन करून जीवनयात्रा संपविली आहे. हिरालाल पंढरीनाथ सोनवणे (वय ३७, रा.पिळोदा खुर्द) असे आत्महत्या करणाऱ्या कर्जबाजारी शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी यावल पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.
यावल तालुक्यातील पिळोदा खुर्द येथील हिरालाल पंढरीनाथ सोनवणे आई, भाऊ, पत्नी, २ मुले यांच्यासह राहत होता. शेतीकाम करून परिवाराचा उदरनिर्वाह करत होता. यंदा देखील हिरालाल यांनी शेतीसाठी बँकेकडून कर्ज घेतले होते. गावात देखील काही जणांकडून उसनवारीने रक्कम घेतली होती. या पैशांसाठी हिरालाल यांच्यामागे तगादा सुरु झाला होता. मैताने मायक्रो फायनान्स कंपनीकडून कर्ज काढले होते. त्या कर्जाचा डोक्यावर बोजा असताना शेतात टाकलेल्या पिकांचे निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान झाले होते. यामुळे उत्पन्न फारसे चांगले आले नाही.
शेतमालाला देखील भाव मिळत नसल्याने कर्ज कसे फेडायचे या चिंतेत हिरालाल असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. याच विवंचनेत हिरालाल सोनवणे यांनी २६ जानेवारीला कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार कुटुंबियांना लक्षात आल्यानंतर हिरालाल यांना जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मंगळवारी पहाटेच्या सुमारास हिरालाल सोनवणे यांचा मृत्यू झाला.
घरगुती वादातून एकाची आत्महत्या
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणांवरून खून, खुनाचे प्रयत्न आणि आत्महत्या यांसारखे प्रकार दिसून येत आहे. असे असताना आता ठाणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून एका व्यक्तीने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. याबाबतची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे.
