🔴 रायगड लोकधारा वृत्त :
दिनांक : ४ नोव्हेंबर २०२५
मुंबई प्रतिनीधी : सतिश पाटील – बदलापूर रेल्वे स्थानक परिसरातील नागरिकांच्या समस्या आणि सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. स्थानिक नागरिक, प्रवासी व रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत विविध विषयांवर विचारविनिमय झाला.
🔹 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कमतरता
स्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे निदर्शनास आले. चोरीसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रत्येक कोपऱ्यावर आणि मध्यभागी कॅमेरे बसवले जाणे आवश्यक असल्याचे मत मांडण्यात आले. याबाबत मंगळवारी अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
🔹 तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया
स्थानिक पातळीवर घडणाऱ्या घटनांसंदर्भात नागरिकांना तक्रार कल्याणपर्यंत पोहोचवावी लागते, हे गैरसोयीचे असल्याचे नमूद करण्यात आले. स्थानकावरच लेखी तक्रार स्वीकारून ती स्थानिक पोलीस ठाण्यात देण्याची व्यवस्था करण्याची सूचना देण्यात आली.
🔹 रेल्वे गाड्यांची वेळ व विलंबाचा प्रश्न
उशिराने धावणाऱ्या गाड्यांबाबत लेखी पत्राद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे सकाळच्या गर्दीच्या वेळेत एक अतिरिक्त लोकल सुरु करण्याची मागणी करण्यात आली.
🔹 सुविधांची कमतरता
सरकते जीने (Escalator), महिला शौचालय आणि पिण्याच्या पाण्याच्या सोयींचा अभाव असल्याने प्रवाशांना अडचणी येतात. याबाबत तातडीने कार्यवाही करण्यासाठी लेखी पत्राद्वारे मागणी नोंदवली जाईल.
🔹 होम प्लॅटफॉर्मचे रखडलेले काम
रखडलेल्या कामाबाबत कारणमीमांसा विचारण्यात आली असून, संबंधित अधिकाऱ्यांकडून लेखी स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे.
🔹 वांगणीकरांची मागणी
वांगणी स्टेशनवरून एक लोकल सुरु करण्याची मागणी नागरिकांनी केली. या मागणीसंदर्भात पुढील मंगळवारी DRM कार्यालयात विशेष बैठक आयोजित करण्यात येणार आहे.
🔹 स्थानकाबाहेरील स्वच्छतेचा प्रश्न
स्थानकाबाहेरील रस्त्यावर पडलेला कचरा आणि अपूर्ण रस्त्याचे काम याबाबत मागील भेटीत आश्वासन देण्यात आले होते, परंतु ते अद्याप पूर्ण झालेले नाही. यावर पुन्हा लक्ष वेधण्यात आले.
🔹 दिव्यांग प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न…
दिव्यांगांसाठी असलेल्या डब्यात वारंवार घुसखोरी होत असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी GM सोबत लवकरच बैठक घेण्यात येईल.
यावेळी बैठकीदरम्यान काही अधिकारी उपस्थित नव्हते, तर काहींनी फोनही स्वीकारले नाहीत. याबाबत SMS द्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. कामकाजात ढिलाई राहिल्यास त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.


