रायगड लोकधारा वृत्तसेवा :
जिल्हा परिषद अध्यक्षपदाची खुर्ची सोडवणार रायगड पालकमंत्री पदाचा तिढा…
जिल्हा परिषद अध्यक्षपदाची खुर्ची सोडवणार रायगड पालकमंत्री पदाचा तिढारायगडच्या पालकमंत्री पदाचा पेच सुटणार ?
शिंदे गट, राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये तडजोडीचे राजकारण…
रायगड पालकमंत्री पदावरून सुरू असलेला वाद अखेर मिटणार असून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक निकालानंतर जिल्ह्यात नंबर एकचा पक्ष म्हणून शिंदे गटावर शिक्कामोर्त झाले आहे.
यामुळे मंत्री भरत गोगावले यांचा पालकमंत्री पदाचा रस्ता मोकळा झाला आहे. परंतु, पालकमंत्री पदासाठी शिवसेनेला रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष पदाबाबत भाजपासोबत तडजोड करावी लागते का? हे गुलदस्त्यात आहे.
रायगडमधील तटकरे कुटुंब आणि शिंदे गटाचे तीन आमदार यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. ठाकरे यांचे सरकार पडण्याचे मूळ या वादात होते. दुसऱ्या कार्यकाळात काही तासांपुरत्या पालकमंत्री झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांना शिंदे गटाच्या तीन आमदाराचा प्रखर विरोध होता. यामुळे आदिती तटकरे यांना पालकमंत्री पद सोडावे लागले. त्यानंतर अद्याप रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची खुर्ची रिकामी आहे. शिंदे गटाकडून भरत गोगावले वारंवार पालकमंत्री पदासाठी दावा करीत असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसने देखील त्यांचा दावा कायम ठेवला आहे. मात्र, जिल्ह्यातील भाजपच्या तीन आमदारांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात असल्याने दोघांच्या भांडणात भाजप संधी साधणार, अशी चर्चा सुरु आहे.
अध्यक्ष पदाचे गणित चुकले, पण….
जिल्ह्यात शिंदे गटाइतकेच आमदार भाजपाकडे देखील आहेत. शिवाय पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि पेणचे आमदार रवींद्र पाटील हे अनुभवी असताना आणि पालकमंत्री पदासाठी पात्र असताना भाजपाने दावा केलेला नाही. यामागे भाजपाची वेगळी रणनीती दिसून येते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद भाजपाला मिळवायचे होते. परंतु, पेझारी नाक्यावर आणि सुधागडमध्ये झालेल्या पराभवामुळे भाजपाचे अध्यक्ष पदाचे गणित चुकले. भाजपाच्या मदतीशिवाय शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषदेत सत्तेत बसू शकत नाही. यामुळे रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष पद आणि पालकमंत्री असा नवा पर्याय पुढे येवू शकतो.
भाजपची वेगळी रणनिती :
राष्ट्रवादी काँग्रेसचा केवळ एक आमदार असताना अनपेक्षितपणे पुन्हा आदिती तटकरेना पालकमंत्री पद देऊन जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी संघर्ष सुरू ठेवण्यामागे भाजपाची मोठी खेळी असल्याचे बोलले जात आहे. जिल्हा भाजपमय करण्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद महत्त्वाचे वाटत आहे. त्यामुळे आगामी काळात घडामोडी होऊन रायगडचे पालकमंत्री पद शिवसेनेच्या वाट्याला गेले तरी त्यामागे मोठी तडजोड असणार आहे हे निश्चित असणार आहे.
