रायगड लोकधारा वृत्तसेवा :
पत्रकार कैलास राजे घरत / खारपाडा : पेण : रा.जि.प.शाळा नवघर उरण येथे जागर दुर्गांचा..ध्यास गडकोट संवर्धनाचा..कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आवाज महामुंबईचा न्यूज चॅनलचे संपादक सन्माननीय पत्रकार मिलिंद खारपाटील साहेब व रायगड लोकधारा न्यूज व वृत्तपत्र संपादक विजय चंद्रकांत गायकर साहेब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सुरुवात केली. या कार्यक्रमाचे आयोजन उत्कृष्ट सूत्रसंचालक, समालोचक, गायक, खेळ पैठणीचा, जाणता राजा प्रतिष्ठान पागोटे उरण संस्थापक अध्यक्ष श्री.विवेक चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यावेळी उरण पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री. महादेव बंडा, अविनाश म्हात्रे शिवसेना शाखाप्रमुख नवघर, श्री.सुनील जोशी रायगड जिल्हा संघटक पुरोगामी पत्रकार संघ भारत, सामाजिक कार्यकर्ते मितेश पाटील-रावे पेण, आदर्श शिक्षक कौशिक ठाकूर सर, जाणता राजा प्रतिष्ठान सचिव विशाल ठाकूर, रोशन ठाकूर सहसचिव, सेवानिवृत्त शिक्षक संजीव पाटील, भरत पाटील, उपसरपंच विश्वास तांडेल आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. नवघर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.समता रामचंद्र ठाकूर यांनी शिवशंभू चरित्र इतिहास अभ्यासक, दुर्ग अभ्यासक, दुर्गसेवक पत्रकार कैलासराजे कमलाकर घरत यांचा शाल पुष्गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शिवकन्या ओवी कैलासराजे घरत हिने पहाडी आवाजात गारद दिली. दुर्ग अभ्यासक पत्रकार कैलासराजे घरत यांनी विद्यार्थी आणि मान्यवर यांच्यासोबत ध्येय मंत्र आणि गडकोट प्रतिज्ञा घेतली. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक, आपले संपूर्ण जीवन शिवशंभू कार्यासाठी वाहिलेले, शिवकार्य हेच माझे जीवन कार्य आहे असे मानणारे दुर्ग अभ्यासक कैलासराजे घरत यांनी गडकील्यांची माहिती देता देता संपूर्ण शिवशंभू चरित्र, पराक्रमी मावळ्यांचा इतिहास जागविला. एकच ध्यास! गडकोट विकास!! तुमचं आमचं नातं काय?..जय जिजाऊ! जय शिवराय!!.. रक्ता रक्तात भिनलय काय?.. जय जिजाऊ! जय शिवराय!! या घोषणांनी शाळा परिसर दुमदुमून गेला..सारे वातावरण शिवमय झाले होते…गडकोट संवर्धनाबाबत अनमोल मार्गदर्शन करताना दुर्ग अभ्यासक कैलासराजे घरत म्हणाले, आज महाराज शरीराने इथे नसले तरी त्यांच्या पराक्रमाची गौरवगाथा सांगणारे गडकिल्ले आहेत. तिथल्या प्रत्येक कणाकणात महाराजांचं अस्तित्व आहे. म्हणूनच ह्या अभेद्य गडकिल्ल्यांकडे मन सतत ओढ घेतं. त्यांना भेटलं की महाराज भेटले असं वाटतं. सह्याद्रीत भटकताना एक वेगळीच अनुभूती येते. गड किल्ले आमचे धारातिर्थे आहेत. आमचे ऊर्जा स्तोत्र आहेत. त्यांचे पावित्र्य आम्ही राखलेच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांचा खरा इतिहास विद्यार्थी, युवा वर्गाला समजावा यासाठी प्रोजेक्टरच्या साह्याने पॉवरपॉइंट पिपिटी द्वारे गड किल्ल्यांची माहिती देण्यात आली. गड कसा पहावा, गाईड का असावा. ट्रेकिंगला जाताना कोणती काळजी घ्यावी, सोबत काय न्यावे, गडाचे प्रकार, गडाच्या विविध भागांची नावे राजदरबार, नगारखाना, राणी महाल, बुरूज, माची, तलाव, हौद, पाण्याचे टाके, तोफा, तटबंदी, बालेकिल्ला, बाजारपेठ, खलबत खाना, दारू कोठारे, धान्य कोठारे, झिंज्या, चिऱ्या, देवळी, महादरवाजा, सदर, घोड्याची पागा, हत्ती तलाव, नाणे दरवाजा, चोर किंवा दरवाजा, होळीचा माळ इत्यादी बाबी समजावून मुलांना शिवरायांचा इतिहास समजावून दिला. ज्या समाजाला आपला इतिहास माहीत नाही तो समाज आपला इतिहास घडवू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास येणाऱ्या पुढील पिढीला कळण्यासाठी गडकोटांच्या रक्षणासाठी कटिबध्द होऊया. बरेच गडकोट नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, जे उरलय ते आपल्याला जपायंच आहे. तर आणि तरच आपण मुलांना गडकोट प्रत्यक्षात दाखवू शकतो. अन्यथा फक्त इतिहासाच्या पुस्तकात पहायची वेळ येईल.
गड किल्ल्यांवर गेल्यावर खालील नियम कटाक्षाने पाळावे १) गडकिल्ल्यांवर कचरा करू नका.
२) गडकिल्ल्यावर मोठ्या आवाजात गाणी लाऊ नका.
३) गडकिल्ल्यांवर दारु.. सिगारेट… नॉन व्हेज पार्ट्या करू नका.
४) गडकिल्लांवरिल पाण्याच्या टाकीत पाय सोडुन बसू नका.. किंवा पाण्यात पोहण्याचा प्रयत्न करू नका.
५) गडकिल्लांवरील ऐतिहासिक वास्तूंना नुकसान होईल अशी कृत्य करू नका.
६) गडकिल्ले सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्येअसतात त्यामुळे तेथील मुक्या प्राण्यांना, पक्षांना, वन्य जीवांना त्रास होईल असे वर्तन करू नका.
७) गडकिल्ले आपले स्वर्ग आहे. त्यांचे पावित्र्य स्वर्गासारखे जपले पाहिजे.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.समता रामचंद्र ठाकूर, उपशिक्षिका उषा राजेंद्र गावंड, प्रकाश परशुराम जोशी, गणेश पांडुरंग गावंड, प्रसाद तुळशीराम म्हात्रे, अनिल वसंत म्हात्रे, श्रीमती सरीता गौतम गोरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचा फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच भावी आयुष्यात मार्गदर्शक ठरेल असे मत मुख्याध्यापकांनी व्यक्त केले. गडकोट संवर्धनाबाबत जनजागृती होण्यासाठी प्रयत्न होणे काळाची गरज आहे ती ओळखून आपण आपले गडकोट रक्षिण्यासाठी कटिबध्द होऊया. सूत्रसंचालक विवेक पाटील यांनी सर्वांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता झाली.
