रायगड लोकधारा वृत्तसेवा :
पनवेल प्रतिनिधी : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्ष सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेला “भरारी २०२६” हा गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व करिअर मार्गदर्शन शिबीर पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पनवेल परिसरातील ५३ शाळांमधील १२० गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करत त्यांना पुढील शिक्षण व करिअरसाठी प्रेरणा देण्यात आली. या कार्यक्रमात जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या संघर्षमय जीवन प्रवासातील अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवत समाजात वेगळे स्थान निर्माण केले, याबद्दलची माहिती देत त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रेरित केले. मेहनत, चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या जोरावर यश मिळविता येते, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर, महापौर नितीन पाटील, नगरसेवक परेश ठाकूर, नगरसेवक रवींद्र जोशी, माजी नगरसेवक अनिल भगत, एम. के. सी. एल., पुणे महाव्यवस्थापक नटराज कटकधोंड, एम. के. सी. एल., कोंकण विभाग मेंटॉर जयंत भगत, कोकण विभागीय समन्वयक मंगेश जाधव, रायगड जिल्हा समन्वयक सिद्धेश गोसावी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह पालक आणि विविध शाळांचे मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिरामध्ये प्रसिद्ध करिअर मार्गदर्शक, लेखक व व्याख्याते प्रा. विजय नवले यांनी “इयत्ता दहावी व बारावी नंतरचे AI युगातील करिअर्स” या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात AI, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, डिजिटल मार्केटिंग, अॅनिमेशन, गेम डेव्हलपमेंट तसेच विविध आधुनिक क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या करिअर संधींबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणासोबत कौशल्य विकासावर भर देत भविष्यातील स्पर्धेसाठी स्वतःला तयार ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच मा. श्री. नटराज कटकधोंड (महाव्यवस्थापक, एम. के. सी. एल., पुणे) यांनी विद्यार्थ्यांना MS-CIT, KLiC Courses तसेच AI आधारित शिक्षण आणि भविष्यातील तंत्रज्ञान याबाबत मार्गदर्शन केले. आधुनिक युगात डिजिटल कौशल्यांचे महत्त्व वाढत असून विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा सकारात्मक आणि प्रभावी वापर करून स्वतःला सक्षम बनवावे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एम. के. सी. एल.) रायगड विभाग यांच्या वतीने करण्यात आले होते. पनवेल तालुक्यातील सर्व अधिकृत MS-CIT केंद्रांचा या उपक्रमात सहभाग होता. उपस्थित विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि मुख्याध्यापकांनी कार्यक्रमाचे कौतुक करत हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी आणि मार्गदर्शक असल्याची भावना व्यक्त केली.
