रायगड लोकधारा वृत्तसेवा :
उरण| प्रतिनिधी| श्रीनाथ दत्तात्रेय लाड : जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (JNPA) उरण येथील न्हावा शेवा बंदरात काम करणाऱ्या सर्व कंटेनर वाहतूकदार संघटनांनी २८ मे पासून ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा दिला आहे. कंटेनर यार्डावर आकारल्या जाणाऱ्या जाचक शुल्कामुळे हा निर्णय घेण्यात आला असून, या आंदोलनामुळे बंदरातील मालवाहतूक पूर्णपणे ठप्प होऊन देशाच्या आयात-निर्यात व्यवहाराला मोठा फटका बसण्याची दाट शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून रिकाम्या कंटेनरच्या पिक-अप आणि ड्रॉप-ऑफसाठी रिकाम्या कंटेनर यार्ड्सद्वारे (Empty Container Yards) अव्वाच्या सव्वा शुल्क आकारले जात आहे. या अतिरिक्त शुल्काबाबत (LOLO शुल्क) वाहतूकदारांनी संबंधित प्राधिकरणांकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र, कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने वाहतूकदारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. अखेर, न्हावा शेवा कंटेनर ऑपरेशन असोसिएशनने कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क न भरण्याचा आणि २८ मे पासून स्वेच्छेने काम बंद करण्याचा संयुक्त निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान गतिशक्ती योजनेअंतर्गत आणि जागतिक पातळीवरील घडामोडींमुळे जेएनपीए बंदरात आधीच कंटेनरची मोठी कोंडी झाली आहे. त्यातच आता वाहतूकदारांनी संपाचे हत्यार उपसल्यामुळे बंदरातील आयात आणि निर्यातीचे कंटेनर्स जागेवरच अडकून पडतील. याचा थेट परिणाम व्यापारी, आयातदार आणि निर्यातदारांच्या व्यवसायावर होऊन त्यांना आर्थिक फटका बसत आहे.
कंटेनर चालकांच्या टंचाईमुळे आधीच निर्माण झालेल्या अडचणींवर मात करण्यासाठी जेएनपीए प्रशासनाकडून युद्धपातळीवर उपाययोजना सुरू होत्या. परंतु, या नवीन आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे जेएनपीए लॉजिस्टिक व्यवस्थापनासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. आता जेएनपीए प्रशासन आणि वाहतूक संघटना यांच्यात तोडगा निघतो का, याकडे संपूर्ण व्यापारी वर्गाचे लक्ष लागून आहे.
