रायगड लोकधारा वृत्तसेवा :

पत्रकार पुजा चव्हाण उरण : “पगार घ्या महिन्याला लाखाचा, पण वसुली करा फक्त हजारांची !” उरण नगरपरिषदेत हातगाड्या, भाजी-मच्छी विक्रेत्यांकडून होणाऱ्या वसुलीत मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याचा स्फोटक आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश बालचंद्र ठाकूर यांनी केला आहे. नगराध्यक्षांना दिलेल्या पत्रातून त्यांनी तीन कर्मचाऱ्यांच्या पगारावर वर्षाला २९ लाख उधळले जात असताना पालिकेच्या तिजोरीत मात्र फक्त १८ लाख जमा होत असल्याचा धक्कादायक हिशोब मांडला आहे.
मनसेच्या पत्रानुसार, उरण शहरात किमान ७०० ते ८०० हातगाडी, स्टॉल, भाजी-मच्छी विक्रेते व्यवसाय करतात. प्रत्येकाकडून सकाळी २० रुपये आणि संध्याकाळी २० रुपये असे दिवसाला ४० रुपये वसूल केले जातात. या हिशोबाने दररोज किमान २८,००० ते ३२,००० रुपये वसुली होणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात क्लर्क प्रमोद मटकर यांच्याकडून नगरपरिषदेच्या फंडात दररोज फक्त ४,५०० ते ५,००० रुपयांचेच चलन भरले जाते. म्हणजे महिन्याला फक्त १,५०,००० रुपये आणि वर्षाला १८,००,००० रुपये जमा होतात.
याउलट या वसुलीसाठी नेमलेल्या तीन कर्मचाऱ्यांच्या पगारावर मात्र पालिका पाण्यासारखा पैसा ओतत आहे. जानेवारी २०२६ च्या आकडेवारीनुसार प्रमोद लक्ष्मण मटकर यांना मासिक ९७,५३५ रुपये, राकेश हरिचंद्र कामरेकर यांना ७२,०७० रुपये आणि जितेंद्र पांडूरंग जाधव यांना ७२,०७० रुपये पगार दिला जातो. तिघांचा एकत्रित मासिक पगार २,४१,६७५ रुपये आणि वार्षिक खर्च २९,००,१०० रुपये आहे. म्हणजेच वसुली १८ लाखांची आणि कर्मचाऱ्यांवर खर्च २९ लाखांचा. पालिकेला दरवर्षी ११ लाखांचा तोटा सहन करावा लागत आहे.
“हा सरळ सरळ नगरपरिषदेच्या तिजोरीवर दिवसाढवळ्या दरोडा आहे,” असा घणाघात संदेश ठाकूर यांनी केला. “वसुलीच्या नावाखाली कर्मचाऱ्यांकडून कमी चलन भरले जाते आणि उर्वरित पैसा जुगार, मटका आणि दारूवर उडवला जातो, अशी उरणकरांची उघड चर्चा आहे. सामान्य विक्रेत्यांना लुटून अधिकारी आणि कर्मचारी गब्बर होत आहेत.”
मनसेने नगराध्यक्षांकडे मागणी केली आहे की, या तिन्ही कर्मचाऱ्यांची तात्काळ बदली करावी. वसुलीसाठी एकतर ठेका पद्धत अवलंबावी किंवा प्रामाणिक एकाच कर्मचाऱ्याची नेमणूक करावी. “तीन कर्मचाऱ्यांऐवजी एक कर्मचारी नेमला तरी वसुली दुप्पट होईल आणि पालिकेचे लाखो रुपये वाचतील. पण अधिकारी जाणूनबुजून डोळेझाक करत आहेत. यात वरपर्यंत वाटे जात असावेत,” असा संशय ठाकूर यांनी व्यक्त केला.
उरणकर नागरिकांनीही या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. “आमच्याकडून जबरदस्तीने ४० रुपये घेतात, पण पावती देत नाहीत. हा पैसा पालिकेत जातो की कर्मचाऱ्यांच्या खिशात, हे कुणालाच माहित नाही,” असे एका भाजी विक्रेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. आता नगरपरिषद या आरोपांची दखल घेऊन कारवाई करते की या ‘तीन वीरां’ना पाठीशी घालते, याकडे संपूर्ण उरणचे लक्ष लागले आहे.
