रायगड लोकधारा वृत्तसेवा :
शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा – अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची मागणी…
पनवेल प्रतिनिधी / अशोक घरत पनवेल : राज्यातील शिक्षक वर्ग आज केवळ विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणारा गुरु राहिलेला नाही, तर शासनाच्या विविध योजनांचा आधारस्तंभ बनला आहे. शिक्षणासोबतच जनगणना, निवडणूक प्रक्रिया, बीएलओ (BLO) कामकाज, ऑनलाइन माहिती संकलन, पर्यावरण जनजागृती, शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे अशी अनेक जबाबदाऱ्या शिक्षकांवर सोपविण्यात आल्या आहेत. परिणामी विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांवर अतिरिक्त कामांचा मोठा ताण निर्माण झाला असून त्याचा परिणाम त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे.
सध्या शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागलेल्या असल्या तरी शिक्षकांना मात्र सुट्टीचा आनंद घेता आलेला नाही. बीएलओ, जनगणना आणि विविध ऑनलाइन कामांच्या ओझ्याखाली अनेक शिक्षक काम करत असून त्यांच्यात मानसिक तणाव वाढल्याची भावना व्यक्त होत आहे. विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांनाही विश्रांतीची आवश्यकता असताना सुट्टीतही शासकीय कामांची जबाबदारी पार पाडावी लागत असल्याने शिक्षक वर्गात नाराजीचे वातावरण आहे.
दरम्यान, जनगणना मोहिमेदरम्यान अकोला जिल्ह्यातील अँग्लो उर्दू हायस्कूलचे ज्येष्ठ व लोकप्रिय शिक्षक अरविंद त्रिंबकराव जोध यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. जनगणना मोहिमेतील वाढता ताण, सततचे मैदानी दौरे, माहिती संकलन आणि प्रखर उन्हामुळे त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाल्याचे सांगितले जाते. या घटनेनंतर अतिरिक्त शासकीय कामांमध्ये सहभागी शिक्षकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
जनगणना करताना अनेक अडचणी…
१६ व्या राष्ट्रीय जनगणनेच्या घरगणनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल पद्धतीने राबविण्यात येत आहे. यासाठी नियुक्त करण्यात आलेले प्रगणक घरोघरी जाऊन नागरिकांकडून माहिती संकलित करत आहेत. जनगणनेसाठी निर्धारित करण्यात आलेल्या ३४ प्रश्नांची उत्तरे घेताना मात्र त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
“यातून आम्हाला काय फायदा?”, “आम्हाला वेळ नाही, नंतर या”, “तुम्हाला दुसरे काही कामधंदे नाहीत का?”, “आमची झोप खराब करायला येता का?” अशा प्रकारच्या प्रतिक्रिया काही नागरिकांकडून मिळत असल्याची व्यथा प्रगणकांनी व्यक्त केली आहे. अपेक्षित सहकार्याऐवजी अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने त्यांच्या मनोधैर्यावर परिणाम होत असून संतापाची भावना निर्माण होत आहे.
उन्हाचा त्रास, श्वानांची दहशत आणि मनस्ताप…
भर उन्हात गावोगावी, वाड्या-वस्त्यांवर फिरत माहिती संकलित करणाऱ्या प्रगणकांना उष्माघाताचा धोका, श्वानांची दहशत तसेच नागरिकांकडून होणारा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधाही उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या अडचणी अधिकच वाढत आहेत.
निकृष्ट दर्जाच्या साहित्याबाबत संताप…
जनगणना प्रक्रियेसाठी वितरित करण्यात आलेल्या साहित्याच्या निकृष्ट दर्जाबाबतही कर्मचारी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः टोप्या, बॅगा आणि मार्कर पेन यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
उन्हाळ्यात वापरण्यासाठी सुती टोप्या आवश्यक असताना टेरिकॉटच्या टोप्या देण्यात आल्यामुळे डोके आणि केस घामाने चिंब होत असल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली आहे. बॅगांचा दर्जाही समाधानकारक नसल्याचे सांगण्यात येत आहे. तर पुरविण्यात आलेले पेन काही वेळा वापरल्यानंतर बंद पडत असल्याने ती फेकून द्यावी लागत आहेत. राष्ट्रीय महत्त्वाच्या कामासाठी कार्यरत कर्मचाऱ्यांना अशा दर्जाहीन साहित्याचा पुरवठा होणे ही दुर्दैवी बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे.
खाजगी मोबाईल वापरामुळे वाढला ताण…
जनगणना पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होत असल्यामुळे कर्मचाऱ्यांना स्वतःचे खाजगी मोबाईल वापरावे लागत आहेत. सतत ॲप वापरल्याने बॅटरी लवकर संपणे, मोबाईल गरम होणे, हँग होणे आणि स्टोरेज भरून जाणे अशा समस्या निर्माण होत आहेत. ग्रामीण भागातील नेटवर्कच्या अडचणीमुळे माहिती अपलोड करण्यातही अडथळे येत आहेत.
याशिवाय नागरिकांची वैयक्तिक माहिती खाजगी मोबाईलमध्ये तात्पुरती साठविली जात असल्यामुळे डेटा सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. मोबाईल हरवणे, चोरी होणे किंवा हॅकिंग झाल्यास संवेदनशील माहिती गळती होण्याचा धोका असल्याची भीती कर्मचारी व्यक्त करत आहेत.
जनगणना ड्युटीवरून परतताना शिक्षकाचा मृत्यू
लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे जनगणनेची ड्युटी करून परतत असताना झालेल्या अपघातात जिल्हा परिषद शिक्षक सुंदरम वांगस्कर यांचे दुर्दैवी निधन झाले. अवघ्या २९ वर्षांच्या या तरुण शिक्षकाचा मृत्यू संपूर्ण शिक्षक समाजाला चटका लावणारा ठरला. ते अविवाहित असून आई-वडिलांचे एकुलते एक चिरंजीव होते. २०२२ ची टीईटी परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी शिक्षक म्हणून आपली कारकीर्द सुरू केली होती.
शिक्षकांना सन्मानाची वागणूक मिळावी…
जनगणना ही केवळ शासकीय प्रक्रिया नसून देशाच्या विकास आराखड्याचा पाया आहे. यासाठी काम करणारे शिक्षक आणि कर्मचारी आपल्या घरापर्यंत येत असतील तर त्यांना सन्मानाने वागणूक देणे ही प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे. त्यांच्या स्वागतासाठी पिण्याचे पाणी, बसण्यासाठी जागा आणि आवश्यक माहिती वेळेवर उपलब्ध करून देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
शिक्षक म्हणजे खरा कर्मयोगी…
शेवटी शिक्षकही माणूसच आहे. त्यालाही कुटुंब आहे, भावना आहेत, विश्रांतीची गरज आहे. मात्र राष्ट्रकार्यासाठी तो सदैव तत्पर असतो. शाळा, परीक्षा, विद्यार्थ्यांचे भविष्य, जनगणना, निवडणुका, बीएलओ आणि विविध शासकीय जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडणारा शिक्षक हा खऱ्या अर्थाने कर्मयोगी आहे.
स्वतःसाठी काहीच नाही; पण समाजासाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि राष्ट्रासाठी सर्वकाही देणारा हा शिक्षक आज अतिरिक्त कामांच्या ओझ्याखाली दबला जात आहे. आता तरी शासनाने शिक्षकांच्या या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांना न्याय देण्याची गरज असल्याची भावना शिक्षक संघटनांतून व्यक्त होत आहे.
जनगणना करताना प्रगणकांना होत असलेल्या त्रासाबाबत शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात आणि शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष धनराज बोडे, जिल्हा सरचिटणीस वीरेंद्र वाघमारे, कार्याध्यक्ष आनंद गिरडकर, ज्येष्ठ सल्लागार संजय चामट, सुनील नासरे, हरीश नासरे, भारती लुटे, लोकेश सूर्यवंशी, गुणवंत इखार, नितीन बारई, संजय दुर्गे आणि आशा झिलपे यांनी केली आहे.
