रायगड लोकधारा वृत्तसेवा :
पनवेल / प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाने केलेल्या सहा वर्षांच्या निलंबनाच्या कारवाईवर माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे यांनी अखेर आपली सविस्तर भूमिका स्पष्ट केली असून पक्षाने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्यावर करण्यात आलेली ही कारवाई पूर्णपणे निराधार आणि वस्तुस्थितीला धरून नसून, केवळ त्रयस्थ व्यक्तींच्या ऐकीव माहितीवरून आणि राजकीय आकसापोटी करण्यात आली असल्याचा खळबणजनक दावा म्हात्रे यांनी केला आहे. या कारवाईच्या निषेधार्थ प्रभाग १४ आणि नेरे विभागातील शेकडो समर्थकांनी सामूहिक राजीनामे देण्यास सुरुवात केल्याने आगामी काळात पनवेल भाजपच्या बालेकिल्ल्याला मोठे खिंडार पडणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
मनोहर म्हात्रे यांनी आपल्या स्पष्टीकरणात निवडणुकीच्या काळातील त्यांच्या अनुपस्थितीचे अत्यंत संवेदनशील कौटुंबिक कारण दिले आहे. ३ जानेवारी २०२६ रोजी त्यांच्या सख्ख्या मोठ्या बहिणीचे नेरे येथे दुःखद निधन झाले होते, ज्यामुळे संपूर्ण कुटुंब शोकाकुल होते. १३ जानेवारीपर्यंत दशक्रिया विधी आणि उत्तरकार्यासाठी त्यांना नाशिक येथे उपस्थित राहावे लागले होते, ही मानवी आणि कौटुंबिक अडचण असतानाही पक्षाने केवळ “प्रचारात सक्रिय नव्हते” असा ठपका ठेवणे पूर्णपणे अन्यायकारक असल्याचे म्हात्रे यांनी म्हटले आहे. सलग तीन वेळा निवडून येऊनही उमेदवारी नाकारली असताना आपण पक्षनिष्ठा जपली आणि १५ जानेवारी रोजी प्रत्यक्ष आमदारांची भेट घेऊन त्यांच्या सूचनांचे पालन केले होते, असेही त्यांनी नमूद केले आहे.
प्रभाग १४ मधील पराभवाची खरी कारणे स्पष्ट करताना म्हात्रे यांनी थेट निवडणुकीतील संशयास्पद घडामोडींवर बोट ठेवले आहे. भाजपच्या सारीका भगत आणि शेकापच्या मनिषा म्हात्रे या एकमेकींविरुद्ध ठरवून उभ्या राहिल्या नव्हत्या, याची माहिती आपण अर्ज भरतेवेळीच उमेदवार इक्बाल काजी यांना दिली होती, असा गौप्यस्फोट म्हात्रे यांनी केला आहे. याशिवाय खांदा गावकीच्या विरोधात असलेल्या व्यक्तींना सोबत घेऊन फिरणे आणि ज्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधात काम केले त्यांनाच पालिका निवडणुकीत समोर ठेवणे, यामुळे निष्ठावान मतदार नाराज झाला आणि त्याचा फटका निवडणुकीला बसला. म्हात्रे यांनी निदर्शनास आणून दिले की, प्रभाग १४ मध्ये २०२४ च्या निवडणुकीतही महायुतीला कमी मतदान झाले होते, मग आताच आपल्याला लक्ष्य का केले जात आहे?
विशेष म्हणजे, मनोहर म्हात्रे यांनी आपल्या कार्यकाळात प्रभागात जी करोडो रुपयांची विकासकामे केली होती, तीच कामे उमेदवाराच्या प्रचारपत्रकावर ठळकपणे वापरण्यात आली; मात्र जाणीवपूर्वक म्हात्रे यांचा फोटो त्यावरून गायब करण्यात आला. “माझे काम वापरायचे आणि मलाच डावलायचे,” ही पक्षाची रणनीती कार्यकर्त्यांना रुचलेली नाही. पक्षात राहून ज्यांनी प्रत्यक्ष गद्दारी केली त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता, केवळ जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना लक्ष्य केले जात असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट आहे. या ‘एकतर्फी’ निर्णयामुळे नेरे आणि ग्रामीण भागातील भाजपच्या संघटनात्मक बांधणीला आगामी काळात मोठे खिंडार पडणार असून, यामुळे पक्षांतर्गत मोठे फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
